मुंबई : राज्यात सर्वाधिक स्ट्राइक रेट राखत भाजपने क्रमांक एकचे यश मिळविले. पक्षाने २९ महापालिकांमध्ये २,२०९ जागा लढविल्या आणि १,४२५ म्हणजे ६४.५१ टक्के जागा जिंकल्या.
शिंदेसेनेने १,४९३ जागा लढविल्या आणि त्यातील ३९९ म्हणजे २६.७२ टक्के जागांवर विजय मिळविला.
राष्ट्रवादी (अजित पवार) ने १,३५५ जागा लढवत १६७ जिंकल्याने १२.३२ टक्के इतका स्ट्राइक रेट मिळविला. उद्धवसेनेने १,२७५ उमेदवार लढविले आणि त्यातील १२.०८ टक्के म्हणजे १५४ उमेदवार जिंकले. काँग्रेसच्या १,३५९ उमेदवारांपैकी ३२४ जिंकले हा स्ट्राइक रेट २३.८४ टक्के आहे. मनसेने ३३० उमेदवार लढवून १३ म्हणजे ३.९४ टक्के जागा जिंकल्या. एमआयएमचे ४२३ उमेदवार लढले, १२६ जागा ते जिंकले, हा स्ट्राइक रेट २९.८ टक्के इतका आहे. आम आदमी पार्टीने ४५५ जागा लढविल्या, पण एकही जागा जिंकता आली नाही.
मुंबईत भाजपने १३५ जागा लढवल्या, त्यापैकी तब्बल ८९ जागा जिंकल्या
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा यशाचा स्ट्राइक रेट सर्वात अधिक आहे. पक्षाने १३५ जागा लढल्या आणि त्यातील ६६ टक्के म्हणजे ८९ जागा जिंकल्या. उद्धवसेनेने १६० जागा लढल्या आणि त्यातील ६५ जागा जिंकल्या. विजयाची त्यांची टक्केवारी ४०.६२ टक्के इतकी आहे.
शिंदेसेनेने २० जागा भाजपसोबत युतीमध्ये लढल्या आणि त्यातली २९ जिंकल्या. त्यांचा स्ट्राइक रेट ३२.२२ टक्के इतका राहिला.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. त्यात काँग्रेसने १५१ जागा लढविल्या आणि २४ जिंकल्या. लढलेल्यांपैकी १५.८९ टक्के इतक्या जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. राष्ट्रवादी (शरद पवार) ने उद्धवसेना आणि मनसेशी आघाडी केली आणि ११ जागा लढविल्या व एकच जिंकली. त्यांनी लढलेल्यापैकी केवळ ०.९० टक्के जागा जिंकल्या.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धवसेनेशी युती करून ५३ जागा लढविल्या होत्या. त्यातील सहा जिंकल्या. त्यांचा स्ट्राइक रेट ११ टक्के इतका आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ३७ जागा स्वबळावर लढवताना तीन ठिकाणी विजय मिळविला. त्यांनी लढलेल्यापैकी ९ टक्के जागा जिंकल्या.
मुंबईतील मतांची टक्केवारी
४५.३९% भाजप
२७.३७% उद्धवसेना
१०.२८% शिंदेसेना
९.४१% काँग्रेस
२.९१% मनसे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 19-01-2026














