स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज : तहसीलदार अक्षय ढाकणे

मंडणगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मतदाता जनजागृती अभियान राबविलेले जाणार आहे. याकरिता तालुक्यातील ग्रामीण भागात पथनाट्य व मतदाता रॅली काढून जनजागृती करणार असल्याची माहिती तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय ढाकणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ढाकणे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. या निवडणुकांमध्ये १ जुलै २०२५ पर्यंत मतदाता यादीत नाव समाविष्ट झालेल्या नवीन मतदारांनाच मतदान करण्याची संधी मिळणार आहे. मतदार यादीत समावेश व मतदाता क्रमांक यांची माहिती मिळवण्यासाठी आयोगाच्या मताधिकार मोबाईल अॅपचा सर्वांनी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व मतदात्यांना त्यांचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदाता सूची नंबरच्या स्लिप निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून वेळेआधीच पोहच केली जाणार आहे. तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी ८५ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून त्याकरिता आवश्यक तयारी सुरू आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमही तालुक्यात सुरु झाले असून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणे व मतदान करणे याकरिता आवश्यक त्या सर्व सोईसुविधांवर विशेष लक्ष देण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 19/Jan/2026