मंडणगड : आपण खेड्यात व मागास तालुक्यात शिक्षण घेत आहोत. म्हणून निराश न होता विद्यार्थ्यांनी समस्यांना धाडसाने सामोरे जायला हवे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वावलंबन, आत्मविश्वास, स्वयंशिस्त व निरंतर कष्ट घेण्याची तयारी असायला हवी हेच आपल्या यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन खेड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शैलेश सणस यांनी केले.
येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय व पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा संपदाताई पारकर होत्या.
सणस पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिवसाचे नियोजन करुन त्याचे काटेकोर पालन करायला हवे. शारीरिक सक्षमतेसाठी व्यायाम करायला हवा. राष्ट्रीय सेवा योजनेतून सेवाभाव शिकावा व त्याचे आचरण करावे. विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी सांगितले की, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आतापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास विविध पदांवर कार्य करण्याची संधी आपणास उपलब्ध होऊ शकते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, संचालक आदेश मर्चेंडे, संतोष चव्हाण, वैभव कोकाटे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋणाली सागवेकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 19/Jan/2026













