राजापूर नगर परिषदेच्या विषय समिती सभापदी पदांसाठी आज विशेष सभा

राजापूर : स्थायी समिती व विषय समिती सभापती व समित्यांवर परिषद सदस्याचे नामनिर्देशन करण्यासाठी राजापूर नगर परिषदेची विशेष सभा मंगळवारी २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. या विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नगरपरिषद राजापूर हे काम पहाणार आहेत. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

सभागृहात पुर्ण बहुमत असलेल्या महाविकास आघाडीने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारल्यानंतर आता या विषय समिती सभापती व सदस्य पदाच्या निवडणूकीत काय होणार याकडे राजापूरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सभेत विषय समितींची संख्या ठरविणे, विषय समितीवर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे, उपाध्यक्ष हे ज्या विषय समितीचे सभापती असतील ती विषय समिती ठरविणे, व इतर विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक असा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या ठरविणे, विषय समित्यांची संख्या निश्चिती व विषय समित्यांची सदस्य संख्या ठरविणे व उपाध्यक्ष ज्या विषय समितीचा पदसिध्द सभापती असेल, ती समिती ठरविणे. तसेच विषय समित्यांवर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे. दुपारी १२ ते २ या वेळेत मुख्याधिकारी यांचेकडे विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूकीकरीता स्वतः नामनिर्देशनपत्र सादर करणे. दुपारी २ ते २. ३० नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, दुपारी २.३० नंतर वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे. दुपारी २. ४५ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेणे. दुपारी २.४५ नंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नांवे वर्णानुक्रमे घोषित करणे. दुपारी ३ नंतर आवश्यकतेनुसार विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूकीसाठी मतदान घेणे व निकाल घोषित करणे. व दुपारी ३.३० नंतर स्थायी समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन उक्त अधिनियमातील कलम 63(2-ब) मध्ये निर्धारीत केलेल्या पध्दतीनुसार करणे व कलम 66 प्रमाणे स्थायी समितीचे गठण करणे असा कार्यक्रम रहाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 20-01-2026