चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची बदली

चिपळूण : गेली दोन वर्षे चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारे मुख्याधिकारी विशाल श्रीरंग भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. ते आता सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्यांच्या जागी संजय जाधव हे नवे मुख्याधिकारी लवकरच चिपळूण नगर परिषदेत रुजू होतील. ही बदली १९ जानेवारी रोजी शासनाचे अवर सचिव अशोक लक्कस यांनी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कार्यकाळात आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला. ‘माझी वसुंधरा’ अभियानात चिपळूण शहराला कोकणात पहिला, तर राज्यात १४वा क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नव्या पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी दर रविवारी ‘वाचू आनंदाने’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. इंधन बचत व पर्यावरण संवर्धनासाठी दर महिन्याच्या एक तारखेला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकलने किंवा चालत कार्यालयात यावे, हा उपक्रम राबवण्यात आला. स्वतःही ते सायकलने नगर पालिकेत येत असत. चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त व्हावे, यासाठी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 20/Jan/2026