रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर मोटारीने दुचाकीला उडवले. अपघात घडताच मोटार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संशयित चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
अखिल ताजुद्दीन पटेल (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अखिल पटेल याने मोटार (क्र. एमएच-०३ झेड ५६६२) निष्काळजीपणे चालवून पुढे जाणारी दुचाकी (क्र. एमएच-०८ एयू ६६३३) वरिल सौ. सुनिता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) या कामानिमित्त लाला कॉम्पलेक्स येथे येत असताना त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्या जाग्यावरच कोसळल्या त्यांच्या अंगावरुन मोटार गेली. मात्र मोटार चालक पटेल याने घटनास्थळावरुन पलायन केले.
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार वाहन चालकाचा शोध घेत होते. सोमवारी पोलिसांनी संशयित अखिल पटेल याला गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
एक उमदे व्यक्तीमत्व हरपले…
सौ. सुनीता साळवी या गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसायात होत्या. रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शहरात त्यांची दोन पार्लर आहेत त्यांनी आपल्या कष्टाने हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. अत्यंत नम्र, मितभाषी आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या होत्या. त्यांच्या अशा जाण्याने त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. कोणालाही अपशब्द न वापरता सर्वांना प्रेमाने वागवणारे एक उमदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 20-01-2026














