पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हे गेल्या दोन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. या कालावधीत सुमारे ७०० शाळांच्या माध्यमातून अंदाजे ६० हजार विद्यार्थ्यांनी पावस येथील समाधी मंदिरात दर्शन घेतले असून परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिक वैशिष्ट्यांची माहिती प्रत्यक्ष अनुभवली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शालेय सहलींमुळे हे तीर्थक्षेत्र शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. शालेय सहलीदरम्यान विद्यार्थी रत्नागिरी शहरासह पावस, त्यानंतर गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिर व समुद्रकिनारा, पूर्णगड येथील ऐतिहासिक किल्ला, तसेच गावखडी येथील सुरू वन व समुद्रकिनारा या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. एक, दोन व तीन दिवसांच्या सहलींच्या माध्यमातून विद्यार्थी या परिसरातील इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत ५५० शाळांमधील ३९ हजार ७३० विद्यार्थ्यांनी केवळ दर्शनाचा लाभघेतला, तर भक्तांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या भक्तनिवासात सुमारे २०० शाळांमधील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी मुक्कामाची सुविधा घेतली. अशा प्रकारे एकूण साठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध सोयी-सुविधांचा लाभ घेतला. शालेय सहल हा अध्ययन-अध्यापन पूरक महत्त्वाचा उपक्रम असून केवळ फेरफटका एवढाच त्याचा अर्थ नसतो. ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ले, मंदिरे, कारखाने, लघुउद्योग यांना दिलेल्या भेटींमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, संवाद कौशल्य, अनुभव लेखन, जबाबदारीची जाणीव व सामाजिक भान विकसित होते.
शालेय सहलीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव व पालकांची लेखी संमती आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून पावस येथील तीर्थक्षेत्र हे केवळ धार्मिकच नव्हे तर शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्टीनेही विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
शैक्षणिक सहलींमुळे येणारे विद्यार्थी कोकणी उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या उत्पादनांची जाहिरात महाराष्ट्रभर पोहोचते आणि पर्यटकांची संख्या वाढते- शरयू सुर्वे व्यावसायिक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 20/Jan/2026














