Breaking: पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड (वय ४३) याचा आज, २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरु होते.

प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

समीर गायकवाड गेल्या काही काळापासून जामिनावर बाहेर होता आणि सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पहाटेच्या सुमारास उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कोण होता समीर गायकवाड?
समीर गायकवाड हा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात झालेल्या गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात तो मुख्य संशयित होता. पानसरे हत्येनंतर सात महिन्यांनी, म्हणजेच १६ सप्टेंबर २०१५ रोजी त्याला सांगलीतून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडे अनेक मोबाईल सिमकार्ड जप्त केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि पुराव्याअभावी २०१७ मध्ये त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास पुढे राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला होता, ज्यामध्ये समीरसह इतर ९ जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 20-01-2026