चिपळूण : चिपळुणातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पक्षाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल अतिथी येथे तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राऊत यांनी उपस्थितांना आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, असे स्पष्ट केले. मात्र, या बैठकीला आ. जाधव चिपळुणात असूनही सहभागी नसल्याची चर्चा शिवसैनिकांत सुरू असतानाच या बैठकीचे निमंत्रण आमदार जाधव यांना देण्यात आले की नाही या विषयावरून शिवसेना अंतर्गत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात आज उबाठा शिवसेना गटाची राजकीय दिशा स्पष्ट झाली. पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे सांगितले जाते.
या बैठकीत सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने, ताकदीने शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जावे, अशा स्पष्ट सूचना राऊत यांनी दिल्या. राऊत म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी कोणतेही मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी संघटनेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. काहींनी भावना व्यक्त केल्या, तर काहींनी नाराजीही उघडपणे मांडली. मात्र, सर्व चर्चाचा निष्कर्ष संघटनात्मक एकजुटीवरच झाला, असे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र अंतिम निर्णय येत्या काळातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर परिषद निवडणुकीदरम्यान आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र होते. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. मात्र, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आ. भास्कर जाधव यांच्या लढवाव्यात, अशा सूचना दिल्या. उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनच घ्यावेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मार्गदर्शनाखालीच तथापि, या बैठकीचे निमंत्रण आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले नसल्याने ते उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक नेतृत्व ते स्वीकारणार की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 20/Jan/2026














