Election 2026 : राजापूर तालुक्यात चौथ्या दिवसापर्यंत एकही उमेदवारी अर्ज नाही

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी (सोमवारी) एकूण ५४ अर्ज वितरित करण्यात आले असून गेल्या चार दिवसांत एकूण ११० अर्ज वितरित झाले आहेत. मात्र अद्याप एकही अर्ज सादर झालेला नाही अशी माहिती राजापूर निवडणूक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन चार दिवस लोटले आहे. या चार दिवसाच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी तेरा तर दुसऱ्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज यांचे वितरण करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कामकाज बंद होते. सोमवारी दिवसभरात ५४ अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत एकूण ११० अर्जाचे वितरण झाले असून आणखी दोन दिवस उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत असणार आहे.

गेल्या चार दिवसांत एकही अर्ज सादर करण्यात आलेला नाही. आता उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असून या दोन दिवसांत मोठया प्रमाणावर अर्ज सादर होणार आहेत. एकीकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत सुरू होऊन चार दिवस लोटले तरी अद्याप आघाडी अथवा युतीबाबत कोणतीच घोषणा झालेली नाही. इच्छुकांची मांदियाळी पाहता बंडखोरीचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 20/Jan/2026