गुहागर : उद्योजकतेच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संधी आपण शोधल्या पाहिजेत. संकटे आणि आव्हाने ही कोणत्याही व्यवसायात असणारच आहेत, परंतु न डगमगता त्याला समर्थपणे सामोरे गेल्यास नक्कीच आपण त्यात यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन गुहागर शहरातील खातू मसाल्याचे सर्वेसर्वा व उद्योजक शाळीग्राम खातू यांनी केले.
तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी खातू मसाले उद्योगाला भेट दिली असता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना खातू मसाला कशाप्रकारे तयार होतो आणि त्याचे उत्पादन कसे चालते, खातू मसाला कशाप्रकारे सुरू झाला आणि त्याचा विकास कसा झाला याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना इच्छाशक्ती असेल तर आपण अशक्य अशा गोष्टीदेखील साध्य करू शकतो. तसेच कोकणामध्येदेखील व्यवसायातील विविध संकटे आणि आव्हाने कशी असतात आणि त्यावर कशी मात करावयाची याची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम, सुभाष घडशी, सूरज खातू यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 20/Jan/2026














