चिपळूण : महानिर्मिती आयोजित आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचे सोमवारी दि. १९ जानेवारी रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये उत्साहात आणि दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख्य अतिथी म्हणून नवीकरणीय ऊर्जा मुंबई मुख्य अभियंता प्रफुल्ल कुटेमाटे व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय चोपडे, मुख्य अभियंता पोफळी तसेच कोयना वीज केंद्रातील सर्व अधीक्षक अभियंते संतोष चव्हाण, एम.सी. गायकवाड, रोहीदास आव्हाड, कल्याण अधिकारी प्रसाद निकम आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या स्पर्धा कोकणातील चिपळूण शहरात होत असल्यामुळे कोकणचे विशेष असे ‘कोकणी गा-हाणे’ घालून उद्घाटन करण्यात आले. त्याआधी प्रमुख अतिथींचे तुतारी, ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्रातून वीज निर्मितीच्या विविध केंद्रातून आलेल्या नाट्यकर्मीना संबोधित करताना वीज निर्मितीसारख्या अत्यावश्यक सेवेत काम करत असतानाही आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि दैनंदिन कामकाजातून थोडासा वेळ काढून विरंगुळा मिळावा तसेच कर्मचाऱ्यांतील संघभावना वाढीस लागून स्वतः सोबतच कंपनीचीही प्रगती व्हावी, असा नाट्यस्पर्धा आयोजनाचा उद्देश असल्याचे सांगितले.
पाच दिवस चालणाऱ्या या नाट्यस्पर्धेतील दहा नाटकांमध्ये विविध सामाजिक विषय तसेच धमाल विनोदी नाटकं सादर केली जाणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर कोयना जलविद्युत केंद्रातर्फे सकाळच्या सत्रात ‘कार्टी नंबर वन’ हे तुफान विनोदी तसेच संध्याकाळच्या सत्रात पारस औष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘बातमीची गोष्ट’ हे सामाजिक विषय घेऊन नाटक सादर झाले. दोन्ही नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर नाट्यस्पर्धेसाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सर्व नाट्य प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 20/Jan/2026














