१४.५० लाख कोटींचे करार! १५ लाख रोजगाराच्या संधी; दावोसमध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा डंका

दावोस: भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी ‘महाराष्ट्राचे गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले.

या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डेटा सेंटर्स ईव्ही-ऑटोमोबाइल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री फडणवीस, उद्योग मंत्री सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी मंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोसमधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरू केले आहे.

हे झाले सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकार-कार्ल्सबर्ग
क्षेत्र : अन्न प्रक्रिया आणि कृषी
गुंतवणूक : ५०० कोटी रुपये
रोजगार : ७५०

महाराष्ट्र सरकार-योकी ग्रीन एनर्जी
क्षेत्र : नविनीकरणीय ऊर्जा
गुंतवणूक : ४ हजार कोटी रुपये
रोजगार : ६ हजार
ठिकाण : पालघर/एमएमआर

महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स
क्षेत्र : स्टील
गुंतवणूक : ५६५ कोटी रुपये
रोजगार : ८४७
ठिकाण : पालघर/एमएमआर

एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी
गुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्स
रोजगार : ८० हजार
एमएमआरडीए-के. रहेजा
गुंतवणूक : सुमारे १० बिलियन डॉलर्स
रोजगार : एक लाख

एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील
गुंतवणूक : सुमारे २५ बिलियन डॉलर्स
रोजगार : २ लाख ५० हजार

एमएमआरडीए-एसबीजी समूह
क्षेत्र : लॉजिस्टिक्स
गुंतवणूक : सुमारे २० बिलियन डॉलर्स
रोजगार : ४ लाख ५० हजार

एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल
गुंतवणूक : सुमारे ८ बिलियन डॉलर्स
रोजगार : ८० हजार

एमएमआरडीए-जायका
धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर

एमएमआरडीए-सेम्बकॉर्प
डेव्हलपमेंट लि. सिंगापूर
एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर

एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटी, म्युनिच, जर्मनी
शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली

महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात
क्षेत्र : स्टील
गुंतवणूक : २० हजार कोटी
रोजगार : ८ हजार
ठिकाण : गडचिरोली

महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स
क्षेत्र : आयटी, डेटा सेंटर्स
गुंतवणूक : १ लाख कोटी
रोजगार : १ लाख ५० हजार

दावोस येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात, याची काळजी घेतली जाईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 21-01-2026