Election 2026 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खेडमध्ये १६ उमेदवारी अर्ज दाखल

खेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आजपासून खेड तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. युतीच्या उमेदवारांनी आज भव्य मिरवणूक काढत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. सोमवार, दि. १९ रोजी जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ५ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज झाले आहेत.

यावेळी युतीच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच शिवसेना उपनेते संजय कदम प्रमुख उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भाजपतर्फे देखील तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी खेड तालुक्यात एकूण ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण आहेत. तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती व २१५ समाविष्ट गावांचा या निवडणुकीत समावेश आहे. एकूण १ लाख ३८ हजार ९२४ मतदार असून त्यामध्ये ६८ हजार २०६ पुरुष व ७० हजार ७१८ महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये सुकवली (नामाप्र), भरणे (नामाप्र स्त्री), भडगाव (नामाप्र), दयाळ (सर्वसाधारण), विराचीवाडी (नामाप्र स्त्री), लोटे (नामाप्र स्त्री), धामणदेवी (सर्वसाधारण स्त्री) असे जिल्हा परिषद गट असून पंचायत समिती गणासाठी सुकीवली (नामाप्र स्त्री), तिसंगी (सर्वसाधारण), खवटी (नामाप्र स्त्री), भरणे (सर्वसाधारण), भडगाव (सर्वसाधारण), जामगे (अनुसूचित जाती स्त्री), दयाळ (सर्वसाधारण स्त्री), बहिरवली (सर्वसाधारण), गुनदे (सर्वसाधारण), विराचीवाडी (नामाप्र), लोटे (सर्वसाधारण), आंबडस (सर्वसाधारण स्त्री), अंजनी (सर्वसाधारण स्त्री) व धामणदेवी (सर्वसाधारण स्त्री) या गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

या निवडणूक कार्यक्रमानुसार १६ जानेवारीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २१ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी होणार असून २३, २४ व २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार कार्यालय खेड, तालुका क्रीडा संकुल इमारत मैदान येथे विविध निवडणूक कामकाजाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक यंत्र व सुरक्षा कक्ष तालुका क्रीडा संकुल, खेड येथे निश्चित करण्यात आला आहे. आज झालेल्या भव्य मिरवणुकीमुळे खेड शहर व परिसरात निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 21/Jan/2026