रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांकडे शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक समिती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे या शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती झाले आहेत. पाणी समिती सभापतीपदी निमेश नायर, आरोग्य समिती सभापतीपदी राकेश उर्फ बाबा नागवेकर, बांधकाम समिती सभापतीपदी संतोष उर्फ बंटी कीर, नियोजन समिती सभापतीपदी सुहेल साखरकर यांची तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी प्रिती सुर्वे आणि उपसभापतीपदी पुजा पवार यांची निवड झाली आहे. शिवसेना-भाजप युतीचे पूर्ण बहुमत असल्याने या सर्व सभापती निवडी बिनविरोध झाल्या आहेत.
रत्नागिरी न.प. च्या समित्यांवरील सभापती आणि सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडला. निवडणूक कार्यक्रमात पहिला विषय उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याकडे शिक्षण समिती देण्याबाबतचा निर्णय एकमताने झाला. भाजपाचे गटनेते राजेश तोडणकर यांनी उपनगराध्यक्षांकडे शिक्षण समिती देण्याचे सूचित केले. शिवसेनेच्या गटनेत्यांनी या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर पिठासन अधिकारी वैभव गारवे यांनी उपनगराध्यक्ष आता शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती असतील असे घोषित केले.
भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याकडे शिक्षण समिती सुपूर्द झाल्यानंतर इतर समित्यांच्या सभापतीची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणी समिती सभापतीपदी निमेश नायर, आरोग्य समिती सभापतीपदी राकेश उर्फ बाबा नागवेकर, बांधकाम समितीपदी संतोष उर्फ बंटी वणजू, नियोजन समिती सभापतीपदी सुहेल साखरकर, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी प्रिती सुर्वे आणि उपसभापतीपदी पूजा पवार यांच्या बिनविरोध निवड झाल्या असल्याचे पिठासन अधिकाऱ्यांनी घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 21/Jan/2026














