मुंबई : दीपावलीच्या आगमनाची पूर्वसूचना देणारा धनत्रयोदशीचा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरा केला जातो. मृत्यूची देवता मानले जाणारे यमराज आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते. धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवसाशी संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात. या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले, असे मानले जात असल्याने धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणूनही जाहीर करण्यात आला आहे.
दिव्यांची ओळ म्हणजे दीपावली. ज्या सणाला लोक दिव्यांची माळ उजळवतात तो सण म्हणजे दीपावली. रस्तोरस्ती दिव्यांच्या रांगा दिवाळीत पाहायला मिळतात. उजळविलेल्या दिव्यांमुळे दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखला जातो. संस्कृतमध्ये ज्याला ‘दीपावली’ म्हटले गेले, त्यालाच लोकभाषेत ‘दिवाळी’ म्हटले गेले आहे. या दिवशी संध्याकाळ होताच घराघरांत दिवे उजळविले जातात. लक्ष्मीला घरात येण्यात अडथळा वाटू नये म्हणून हे दिवे उजळविले जातात. लक्ष्मी ही धन-धान्य, सोने-चांदी, पैसा, संपत्ती आणि भौतिक संपदेची देवता आहे. धन-धान्य आणि संपत्तीला आवाहन करण्यासाठी इतका झगमगाट करणारा असा वार्षिक उत्सव भारताव्यतिरिक्त अन्य देशांत क्वचितच साजरा केला जात असावा. दिवे उजळवून लक्ष्मीची पूजाअर्चा करणे, आपल्या हिशेबाच्या वह्या आणि तिजोर्यांवर स्वस्तिक चिन्ह उमटवून ‘श्री लक्ष्मै नमो नमः’ किंवा ‘श्री लक्ष्मी जी सदा सहाय’ किंवा ‘शुभ लाभ’ असे लिहिणे, अशा दिवाळीच्या प्रथा आहेत.
‘आरोग्यम् धनसंपदा’ असा मंत्र देणार्या भारतीय संस्कृतीत आरोग्याचे स्थान धनापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे. ‘पहला सुख निरोगी काया, दूजा सुख घर में माया’ हे सुभाषित आजही प्रचलित आहे. त्यामुळेच दीपावली या वर्षातील सर्वांत मोठ्या सणात धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले असून, दीपावलीच्या आगमनाची पूर्वसूचनाच धनत्रयोदशीमुळे मिळते. उत्सवाच्या सुरुवातीला धन्वंतरी या आरोग्याच्या देवतेची पूजा करणे हे भारतीय संस्कृतीला अनुसरूनच आहे. पुराणकथांमधील संदर्भांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात धन्वंतरी देव हाती अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे विष्णूंचे अंशावतार आहेत, असे मानण्यात येते. जगात आरोग्यशास्त्राचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठी साक्षात विष्णूच धन्वंतरीच्या अवतारात प्रकट झाले होते, अशी शास्त्रमान्यता आहे. धन्वंतरीच्या प्रकट दिनाचे औचित्य साधूनच धनत्रयोदशी साजरी केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी किंवा अन्य धातू कुवतीनुसार खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी घरातील देव्हार्यात दिवा उजळला जातो. तसेच मृत्यूची देवता मानल्या गेलेल्या यमराजांसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्यात येतो. हिंदीत ‘धनतेरस’ नावाने साजरी करण्यात येणारी धनत्रयोदशी हा हिंदूंचा एक पवित्र सण आहे. धन्वंतरी देवतेचा प्रकट दिन हाच असल्यामुळे या सणाला अधिक महत्त्व आहे. धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. पृथ्वीवर आयुर्वेदाच्या प्रसारासाठीच विष्णूंनी धन्वंतरीचे रूप घेतले, अशी मान्यता आहे. चार हात असलेले धन्वंतरी देव समुद्रमंथनातून प्रकट झाले. सागरातून अवतरित होताना धन्वंतरीच्या एका हातात औषधी आणि दुसर्या हातात अमृतकुंभ होता. अन्य दोन हातांमध्ये विष्णूंप्रमाणेच शंख आणि चक्र होते. समुद्रमंथनावेळी शरद पौर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला कालीमाता आणि अमावास्येला लक्ष्मी देवता प्रकट झाली, असे मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी घराची व्यवस्थित साफसफाई करून सायंकाळी दिवे उजळवून लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी ही सुख, समृद्धी आणि वैभवाची देवता आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मीने प्रकट होऊन एका गरीब, दुःखी शेतकर्याला अक्षय्य संपत्तीचे वरदान दिले होते, असे मानले जाते. त्यामुळेच धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या यांच्याबरोबरच धनसंपत्तीची देवता असलेल्या कुबेराची पूजाही धनत्रयोदशीला अनेक घरांमधून केली जाते. या दिवशी कुबेर देवाची विधिवत पूजा केली असता, तो प्रसन्न होऊन आजन्म धनसंपत्तीचा आशीर्वाद देतो, अशी धारणा आहे. कुबेराला प्रसन्न करण्यासाठी त्याचे चित्र किंवा कुबेर यंत्रासमोर दिवा उजळविणे किंवा कुबेर मंत्राचा जप करणे पुरेसे मानले जाते. धनप्राप्तीसाठी कुबेराची पूजा केवळ धनत्रयोदशीलाच नव्हे तर दररोज केली जाऊ शकते. अनेक लोक धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत लक्ष्मीसोबत कुबेराची भक्तिभावाने पूजा करतात. धनत्रयोदशीचा दिवस यमराजालाही समर्पित आहे. या दिवशी संध्याकाळी यमाला दीपदान केले जाते. यमाची पूजा, आराधना करण्याचा संपूर्ण वर्षातील हा एकमेव दिवस आहे. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. धनत्रयोदशीला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास त्या घरात कुणाचाही अकाली मृत्यू होत नाही, अशी धारणा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीगणेश आणि लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी गणेश-लक्ष्मीची मूर्ती खरेदी केल्यामुळे वर्षभर घरात धनसंपत्तीचे आगमन होत राहते, असे मानतात. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने तसेच चांदीची भांडी खरेदी करणेही शुभ मानले जाते. ज्यांना चांदीची भांडी खरेदी करणे शक्य नाही, ते इतर धातूंची भांडीही खरेदी करू शकतात. पितळ हा धन्वंतरीचा आवडता धातू असल्यामुळे या दिवशी पितळेची भांडीही खरेदी केली जातात. असे केल्यास धन्वंतरी प्रसन्न होतात, अशी धारणा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 29/Oct/2024














