Lanja : कुर्णे येथे घरात सडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

लांजा : तालुक्यातील कुर्णे गावातील एका घरात एकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरेश रामचंद्र पड्ये (वय ४५, रा. कुर्णे) असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पड्ये कुर्णे येथे वास्तव्यास होते. पाच दिवसांपासून त्यांची मुलगी त्यांना वारंवार फोन करत होती, मात्र ते फोन उचलत नव्हते. संशय आल्याने मुलीने सोमवारी रात्री तिचे चुलत काका शाम पड्ये यांना फोन केला आणि ”बाबा फोन उचलत नाहीत, घरी जाऊन एकदा खात्री करा,” अशी विनंती केली.

त्यानुसार, शाम पड्ये यांनी सोमवारी रात्री ९:४५ च्या सुमारास सुरेश यांच्या घरी जाऊन पाहिले असता, त्यांना सुरेशचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना आणि लांजा पोलिसांना याची माहिती दिली. लांजा पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. रात्र झाल्यामुळे मंगळवारी सकाळी रत्नागिरी येथून श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

अप्पर पोलिस अधीक्षक जयंत महामुन्नी, उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक अमोद सरगंले आणि उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव, हवालदार राजेंद्र कांळे, नितेश राणे आणि अन्य पथकाने पंचनामा पूर्ण केला.

सुरेश पड्ये यांच्या डाव्या हातावर मोठी जखम आढळली आहे. त्यामुळे त्यांनी दारूच्या नशेत स्वतःवर वार करून घेतले की कोणीतरी त्यांचा घातपात केला, याबाबत संभ्रम आहे. १५ जानेवारीच्या दुपारी ३ पासून सोमवार रात्रीपर्यंत घरामध्ये कोणीही नसल्याने नेमका प्रकार कधी घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगंले तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 21/Jan/2026