चिपळूण : मानवी जीवनामध्ये निखळ विनोदाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. कोणत्याही कलाकृतीच्या माध्यमातून मानवी भावनांना हात घालणं हे तसं कठीण काम आहे. विनोदी नाटक हेदेखील असंच आव्हानात्मक काम. एकदा ऐकून झालेला विनोद पुन्हा सादर झाल्यास अपेक्षित परिणाम साधला जात नाही. म्हणून विनोदामध्ये नाविन्य असणं, सादरीकरणांमध्ये अत्यंत योग्य टायमिंग असणं, आवाजामधील अपेक्षित चढउतार व देहबोली मधील विनोदी ढंग या गोष्टी विनोदनिर्मितीमध्ये महत्त्वाच्या ठरतात. प्रेक्षकांना निखळ हास्याची अनुभूती देत अपेक्षित परिणाम साधणारं ‘कार्टी नंबर वन’ हे नाटक कोयना जलविद्युत केंद्र पोफळी तर्फे सोमवार दि.१९ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात सादर झाले.
नाटकाचे कथानक होस्टेलवर राहणाऱ्या चार किशोरवयीन मुलांभोवती फिरतं. त्यापैकी तिघांचं एकतर्फी प्रेम व ते मिळवण्याच्या वेड्या आशेवर त्यांनी केलेले प्रयत्न खूप विनोदी ढंगाने नाटकामध्ये सादर केले आहेत. विनोदी प्रसंग साकारताना सर्वच कलाकारांनी साधलेलं टायमिंग खूपच कौतुकास्पद आहे. एकतर्फी प्रेम यशस्वी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून चार मित्रांपैकी दोघांनी स्त्री वेश परिधान करून सादर केलेली मांडणी व त्यातून झालेली विनोद निर्मिती तुफान धमाल झाल्याने लक्षात राहून जाते. नाटकात ठराविक कालावधीने कथानकाच्या गरजेनुसार काही मराठी हिंदी गाणी व संगीत याचा उपयोग खूप समर्पकपणे केला आहे. या वैविध्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात खूप मदत होते.
नाटकाचा शेवट संवेदनशील प्रसंगाने होऊ नये, सभागृह सोडताना नाटकाचा मूळचा विनोदी बाज प्रेक्षकांच्या लक्षात राहावा यासाठीचा तीन पैकी एक बाकी असलेलं एकतर्फी प्रेम सफल होण्याचा छोटासा प्रसंग येतो आणि नाटक संपतं. उत्कृष्ट नेपथ्य व प्रकाश योजनेमुळे सर्वच प्रसंग अपेक्षित परिणाम साधण्यात यशस्वी होतात. नाटकानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘Time well spent’ अशी भावना नक्कीच निर्माण होते. त्यामुळे नाटकाच्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन. नाटकाचे लेखक शिवाजी देशमुख, दिग्दर्शक निलेश मुळे नेपथ्य दिलीप जाधव, विनोद कदम प्रकाशयोजना उदय पोटे, यू. बी. हिवरे संगीत अजित मोटे, अभिजीत एस. शिवहारे, कौस्तुभ देशपांडे रंगभूषा आणि केशभूषा श्रीमती सुनिता परमणे, रवींद्र लवंदे कलाकार साताप्पा राणे, तेजस साळवी, विक्रांत जिरंगे, प्रमोद बोडरे, मोनिका जिरंगे, रामा भगत, सोनाली मोरे, स्वप्नाली पवार रंगमंच व्यवस्था संतोष पवार, विनायक सुतार, एस. एस. सावंत, सुहास एल. शिंदे, एस.एन. डांगरे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 21/Jan/2026














