दापोली : दापोली पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र आज, २० जानेवारी रोजी दाखल केले. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे हे उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले.
दापोली तालुक्यातील सर्व जागांसाठी शिवसेनेने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरले असून, यावेळी पक्षाकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेचे तालुका व शहर पदाधिकारी, विविध विभागांतील कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण दापोली परिसर शिवसेनामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दापोली तालुक्यात शिवसेना व युतीतील इतर पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत न झाल्याने शिवसेनेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) सोबत युती करून सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दापोली प्रांत कार्यालयात पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अधिकृतरीत्या दाखल करण्यात आले.
या निमित्ताने दापोली शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेच्या झेंड्यांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद दाखवून दिली. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मोर्चा प्रांत कार्यालयाकडे वळवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असून, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवू, असा ठाम विश्वास देखील व्यक्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 21/Jan/2026














