करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित ‘श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड’ (Shri Swami Samarth Madhyamik Vidyalaya, Deud) या शाळेचा रौप्य महोत्सवी (Silver Jubilee) वर्षपूर्ती सोहळा शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (MLA Dnyaneshwar Mhatre) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य शशिकांत नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
स्मरणिका प्रकाशन आणि मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि रौप्य महोत्सवी ‘स्मरणिका प्रकाशन’ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार म्हात्रे यांनी शाळेची २ दशकांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. “ग्रामीण भागात संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या या शाळेला आणि संस्थेला माझे सदैव सहकार्य राहील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिनिधी बाबू म्हाप यांनीही शाळेला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतातून शशिकांत नलावडे सरांनी ग्रामस्थ आणि पालकांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीशैल्य पुजारी यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या २५ वर्षांच्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकाची मेजवानी
सकाळच्या सत्रात महिलांसाठी ‘हळदी कुंकू’ कार्यक्रम पार पडला. तर सायंकाळच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते माजी विद्यार्थी संघ आणि सांस्कृतिक कलामंच निर्मित ‘अति पण किती’ हे दोन अंकी सामाजिक नाटक. या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली.
यांची होती प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हा कोषाधिकारी प्रवीण बिरादार, गटशिक्षण अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, संस्थेचे सेक्रेटरी देवस्थळी सर, संचालक विकास नलावडे, निरंजन नलावडे, सौ. प्रिया नलावडे, सौ. सुवर्णा देवस्थळी, सरपंच संजय देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच सल्लागार समितीचे सदस्य संजय देसाई, किसन घाणेकर, श्रीकांत देसाई, यशवंत घाणेकर, विजय कानडे, वसंत रेवाळे आणि इतर सदस्य, रत्नागिरीतील विविध शाळांचे मुख्याध्यापक (अरुण जाधव, पांडुरंग नाईक इ.), शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राजेश जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वास गोताड, उपाध्यक्ष किशोर घाणेकर, सचिव मंगेश घाणेकर उपस्थित होते.
कृतज्ञता सोहळा
यावेळी देणगीदार, गुणवंत विद्यार्थी, आणि शाळेसाठी योगदान देणाऱ्या सल्लागार समिती सदस्य व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप पवार यांनी केले, तर आभार संदेश रहाटे यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देऊड व करजुवे शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 21-01-2026









