मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले आहेत. येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत देखील आहेत. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५१ हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
या दौऱ्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे.
जयराम रमेश यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जातात आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला जातो. असा करार करण्यासाठी परदेशात जाणे खरोखरच आवश्यक होते का, की या संपूर्ण घटनेमागे काही वेगळाच अर्थ दडलेला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जयराम रमेश यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी विविध देशांतील नेते आणि उद्योगपती एकत्र येतात. या व्यासपीठावर राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा सरकारचा दावा असतो. मात्र, मंत्रिमंडळातीलच मंत्र्याच्या कंपनीसोबत सामंजस्य करार झाल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
लोढा यांच्या कंपनीसोबत करार
राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीने राज्य सरकारशी गुंतवणुकीचा करार केला. डेटा सेंटर उभारण्याबाबत लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. डेटा सेंटर्स क्षेत्रात १ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून १.५० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 21-01-2026














