कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावर्डे येथे २६ जानेवारी रोजी रेल रोको आंदोलन

सावर्डे : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावर्डे व परिसरातील ४० हून अधिक गावांतील नागरिकांमार्फत २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. विविध मागण्यांकरिता सावर्डे रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावर्डेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांनी दिला असून तसे निवेदन कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे महामंडळ बेलापूर यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सावर्डे हे कोकण रेल्वे महामार्गावरील अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक असून रोज शेकडो प्रवासी या रेल्वे स्थानकावरुन प्रवास करीत असतात. सावर्डे रेल्वे स्थानकावरून कोकण रेल्वेला अतिशय चांगले उत्पन्न मिळत आहे. तरीही प्रवाशांना दररोज अनेक संकटांना सामना करावा लागत आहे.

सावर्डे रेल्वे स्थानकांवरील अनेक समस्यांचे निराकरण करण्याकरिता यापूर्वीही अनेकवेळा मागणी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने या अन्यायाविरोधात सावर्डे व परिसरातील अनेक रेल्वे प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सावर्डे रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्र. २ त्वरित बांधून निवारा शेड तयार करावी, सावर्डे रेल्वे स्थानकावर तातडीने प्लॅटफॉर्म क्र. २ वर ये-जा करण्याकरिता पूल बांधावा, सावर्डे -आबलोली मुख्य रस्त्यापासून सावर्डे रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता दुपदरीकरणासह रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करावा, सावर्डे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व स्टेशन परिसरात सर्वत्र पथदीप लावावेत, सावडे रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांकरिता पार्किंगची शेड तयार करावी, नागपूर-मडगाव, कोकणकन्या व मत्स्यगंधा तसेच सर्व हॉलीडे, साप्ताहीक एक्स्प्रेस व जादा रेल्वे गाड्यांना सावर्डे स्थानकावर थांबा मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 21/Jan/2026