खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भव्य ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात साहित्यप्रेमी आणि वाचनसंस्कृतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. यानंतर विविध प्रकारचे ग्रंथ आकर्षक पालखीत ठेवून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले आणि महाविद्यालय परिसरात ग्रंथदिंडीची मिरवणूक काढण्यात आली. या ग्रंथदिंडीने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनिता आवटी यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावावी, असे आवाहन केले. वाचनामुळे विचारशक्ती प्रगल्भ होते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. आनंदराव भोसले यांनी वाचन ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. आभासी जगात वावरताना पुस्तक हा खरा मित्र असून “वाचाल तर वाचाल” हा कानमंत्र विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावा, असे त्यांनी सांगितले. माध्यमांमधून मिळणाऱ्या वरवरच्या किंवा अपुऱ्या ज्ञानापेक्षा पुस्तकातून मिळणारे सखोल ज्ञान अधिक महत्त्वाचे असून तेच आयुष्याला योग्य दिशा देते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रंथदिंडीमध्ये एन.सी.सी. विभागाच्या छात्रांनी सादर केलेल्या सुंदर बँडमुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. तसेच एन.एस.एस. स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभागही लक्षवेधी ठरला. ग्रंथदिंडी समाप्तीनंतर भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन चेअरमन अॅड. आनंदराव भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रदर्शनात साहित्य, विज्ञान, इतिहास, आत्मचरित्रे तसेच विविध विषयांवरील मौलिक पुस्तके मांडण्यात आली होती. सुंदर सजावट आणि पुस्तकांची सुबक रचना हे ग्रंथ प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले. या प्रदर्शनाचा लाभमहाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला.
या कार्यक्रमास एन.सी.सी.चे डॉ. सचिन सागर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. साळुंखे, एन.एस.एस.चे समन्वयक प्रा. केळकर, प्रा. मस्के, आय.टी. विभाग प्रमुख डॉ. सचिन भोसले, महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. डी. एम. शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे साडेचारशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. मेघना कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 21/Jan/2026














