रत्नागिरी : माती कसदार असेल तर कोणतेही बियाणे त्यामध्ये उगवतेच. प्रगती ही गती शिवाय होत नाही, ती एक अवस्था असून प्रगती करण्याचे सामर्थ्य फक्त माणसामध्ये आहे, कुतूहल, उसुकता माणसामध्ये हवी, ती जर नसेल तर आयुष्य रुक्ष होऊन जाईल. मुळाक्षरे म्हणजे शिक्षण नव्हे तर अक्षरांची मूळ जीवनापर्यंत घेऊन जाणे म्हणजे शिक्षण होय, आणि ही जीवनाची मुळाक्षरे उत्सुकतेमुळे फुलून येतात. जेष्ठ साहित्यिक, कवी ,गीतकार, प्रसिद्ध व्याख्याते प्रा .श्री. प्रवीण दवणे यांनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मध्ये ‘जो गतीत तो प्रगतीत’ या प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेल्या आणि मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज येथे भेट दिल्या नंतर ते या प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात बोलत होते. मालगुंड ही आधुनिक कवितेचे जनक क्रांतिकारी कवी केशवसुत यांची जन्म भूमी आहे. आधुनिक कवितेची ती राजधानी म्हणून ही ओळखली जाते तसेच साहित्याचे तीर्थक्षेत्र म्हणून ही ती ओळखली जाते, मराठी तील जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी सुद्धा ज्या भूमीचा उल्लेख मराठी कवितेची राजधानी असा केला आहे त्या पावन भूमीत आल्याचे भाग्य आज मला मिळाले आहे ,असे ही आपल्या वक्तव्यातून त्यांनी म्हटले आहे.
या प्रबोधनपर व्याख्यानात आपले विचार मांडत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कायम ज्ञानार्जन करीत राहिले पाहिजे, तसेच शिक्षण घेत असताना त्यात उत्सुकता हवी, जर आपल्याला घडायचे असेल तर तहान पाहिजे त्या शिवाय तुमची प्रगती होणार नाही.
स्पर्धा म्हणजे नेहमी दुसऱ्याला हरवणे नव्हे, स्पर्धा म्हणजे स्वतःच जिंकण्याच्या प्रयत्नात काळाच्या दोन पाऊले पुढे जाणे होय. नियमित वाचन करा, आणि मी कोण आहे याचा सतत विचार करत राहा. माणसाला या जगामध्ये चांगले जगता यावे यासाठी परमेश्वराने आयुष्य रूपी परीस दिलेला आहे, त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला योग्य वेळी समजले पाहिजे. दुसऱ्याचे अनुकरण करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास वाढवा, आत्मविश्वास हा अचानक येत नाही, तो सतत च्या परिश्रमातून कमावता येतो, स्वतःचा शोध घ्या ज्याला स्वतःचा शोध लागला त्याला आयुष्याचा खरा सूर गवसला. या व अशा प्रकारचे ज्ञान वर्धक विचार त्यांनी समस्थ विद्यार्थ्यांसमोर मांडले.
सध्याच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर कसे ठेवावे हे ही आवर्जून सांगितले. रीळ बघता बघता आयुष कधी रीळात गुंतून जाईल हे कळणार देखील नाही. मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवा. जितकी गरज आहे तितकाच त्याचा वापर करा. नाहीतर मोबाईल सारखे विज्ञान जर अज्ञानाने वापरले की जीवनात अडथळा निर्माण होईल. परिस्थिती वर मात करून आयुष्याची सुरुवात करा. संघर्षातून स्वतःला घडवा, गरीबी ही परिस्थितीची नसून ती मनःस्थितीची असते, गाफील राहू नका नशिबाला दोष देऊ नका. दुसऱ्याने केलेल्या कामाला दाद द्या. त्यातून आपल्या मनाचा विकास होतो. दुसऱ्याला चांगले म्हणणे म्हणजे आपल्या तो प्रगतीचा टप्पा आहे. अशा प्रकारचे सडेतोड विचार जेष्ठ साहित्यिक कवी गीतकार प्रसिद्ध व्याख्याते प्रा श्री प्रवीण दवणे यांनी या विशेष कार्यक्रमात आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक कवी गीतकार प्रसिद्ध व्याख्याते प्रा श्री प्रवीण दवणे यांचे स्वागत मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे सचिव विनायक राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे सचिव विनायक राऊत तसेच सल्लागार समिती सदस्य नंदकुमार डिंगणकर, डॉ निमकर, सौ दवणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर,पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 21/Jan/2026














