चिपळूण : येथील आंतर विद्युत केंद्र राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सोमवारी सायंकाळच्या सत्रात सादर झालेले ‘बातमीची गोष्ट’ या नाटकातून माणुसकी व नैतिकता यांचे आयुष्यातील महत्त्व पटवून देण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला. पारस औष्णिक विद्युत केंद्राने हे नाटक सादर केले.
आधुनिक युग हे स्पर्धेचे युग मानलं जातं. आज मानवी जीवनाचं प्रत्येक क्षेत्र हे स्पर्धेने व्यापलं आहे. त्यामुळे आजच्या व्यवहारिक जगात टिकून राहण्यासाठी स्पर्धेत राहणं हे अपरिहार्य होऊन गेलं आहे. आई-वडील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या शिक्षणाची तजवीज करतात. मुले शिकून काही उच्चशिक्षणासाठी अमेरिकेसारख्या विकसित देशात जातात व तिथेच नोकरी स्वीकारून स्थायिक होतात तर काही मुले याच देशात मोठ्या अधिकारी पदापर्यंत जातात. पुढे जाऊन आयुष्यामध्ये स्थैर्य आल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांना आई-वडील नकोसे वाटायला लागतात आणि मोठ्या पदावर पोहोचलेल्या अधिकारी मुलांच्या भ्रष्टाचारामध्ये त्यांची नैतिकता आडवी येत नाही. असं चित्र असताना एक संवेदनशील कथानक गुंफून पारस औष्णिक विद्युत केंद्राने १९ जानेवारीला संध्याकाळच्या सत्रात सादर केलेलं ‘बातमीची
गोष्ट’ हे नाटक माणुसकी आणि नैतिकता यांचे महत्त्व खूप सुंदररित्या पटवून देण्याचा प्रयत्न करतं. नाटकाचं कथानक सेवानिवृत्त शिक्षक दांपत्याभोवती फिरतं. हे दांपत्य अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या एकुलत्या एक मुलाच्या व नातवंडांच्या आठवणीने व्यथीत होत असतं. एके दिवशी फोनवर त्यांचा मुलगा भारतात येऊन त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार असल्याची समजते. मुलाची भेट होणार असल्याचे समजून ते आनंदित होतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच राहतो. कारण मुलगा त्यांना घेऊन जाण्यासाठी नव्हे तर त्यांच्या घराचा व्यवहार करण्यासाठी भारतात आलेला असतो. इतकंच नव्हे तर विमानतळावर आपल्या वयस्कर आई-वडिलांना एकट सोडून स्वतः अमेरिकेला पळ काढतो. पहिल्या अंकामध्ये हे कथानक सादर झाल्यानंतर असं जाणवतं शिक्षित माणसे शहाणी असतातच असं नव्हे.
नाटकाच्या दुसऱ्या अंकात एक धर्मा नावाचं पात्र आत्महत्या करायला निघालेल्या शिक्षक दांपत्यास आसरा देतं. तिकडे अमेरिकेत या शिक्षक दांपत्याची नात प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुंबईत विमानतळावर आई-वडिलांना एकटेच सोडून पळालेल्या व्यक्तीची बातमी वाचते आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. तो शोध घेतल्यानंतर आई-वडिलांना सोडून अमेरिकेला पळालेली ती व्यक्ती आपलेच वडील असल्याची धक्कादायक माहिती तिच्या समोर येते. इकडे ती शिक्षक दांपत्य आपली वास्तव्य असलेल्या गावात मुलांमध्ये मूल्यशिक्षण, माणुसकी, नैतिकता रुजावी आणि पुढची पिढी फक्त शिक्षित न होता संवेदनशीलही व्हावी आणि आपल्यावर जी वेळ आली ती इतर कुणावरही येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. शिक्षक दांपत्याची नात आपल्या आजी-आजोबांचा शोध घेते आणि आजी-आजोबांनी सुरू केलेल्या कार्यात सहभागी व्हायचा निर्णय घेऊन नाटकाची सांगता होते.
या नाटकाचे दिग्दर्शन मधुकर दुफारे, लेखन डॉ. प्रजेश घडसे, नेपथ्य संतोष खडसे, नागसेन वानखेडे, प्रकाशयोजना सुहास वारद, मंगेश घोडमारे, संगीत मयूर पांडे, दिनेश कदम, रंगभूषा आणि केशभूषा मोहिनी वारद, शारदा इलामे यांनी सांभाळली. या नाटकामध्ये मयूर चौधरी, भारती अंभोरे, गजानन इलामे, योगिता वाघ, कैलास खेडकर, जयश्री उगले, वेदांत गव्हाणे, केशव भगत, डॉ. राजेश तायडे, मधुकर दुफारे, स्पंदन खडसे, शौर्य वानखेडे यांनी भूमिका निभावल्या तर नाटकाचे परीक्षण तेजस पवार यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 21/Jan/2026














