Ratnagiri : खराब सर्व्हर, नेटवर्क अभावामुळे ई-पॉस मशिन डाऊन !

रत्नागिरी : अन्नधान्य वाटप करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पुरवठा विभागाच्या वतीने राज्यासह जिल्ह्यात नवीन पॉसमशीन देण्यात आले. त्यामुळे धान्य वितरण सुरळीत सुरू होते, मात्र आता पॉसमशीनला कधी नेटवर्क, सर्व्हर डाऊन, साईटबंदची समस्या भेडसावत आहे. ही समस्या केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात सुरू आहे. त्यामुळे धान्य वाटपास ब्रेक लागला आहे. नेटवर्क आल्यानंतर धान्य दिले जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून पॉसमशीन बंद, चालू होत आहे. त्यामुळे रेशनदुकानदार, रेशनकार्डधारक वैतागले आहेत.

जिल्ह्यात अन्नधान्य वाटप करत असताना पॉसमशीनमध्ये बिघाड, नेटवर्क नसणे यामुळे अन्नधान्य वाटपास उशिर होत होता. मात्र मागील वर्षापासून नवीन फोरजी पॉसमशीन वाटप करण्यात आले होते. त्यामुळे धान्य वाटप सुरळीत होत होते. धान्य वाटपासंदर्भात तक्रारी कमी झाल्या होत्या.

आता मागील काही महिन्यांपासून तसेच गेल्या पंधरादिवसापासून पॉस मशिनला सर्व्हेर नेटवर्क, साईटची समस्या येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान्य वाटपास अडचण होत आहे. काही दुकानदारांनी तक्रारी येवू नये म्हणून लाभार्थ्यांना रेशनकार्ड ठेवून धान्य देतात त्यानंतर ओटीपीसाठी संपर्क करून त्यांची माहिती भरली जात आहे. काहीठिकाणी नेटवर्क, साईट समस्या असल्याचे सांगून नंतर येण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी ही अक्षरशा वैतागली आहे. नव्या वर्षात पॉसमशीनची समस्या येत असल्यामुळे रेशनदुकानदार ही हताश झाले आहेत. जिल्हापुरवठा विभागाकडून यांसदर्भात राज्य पुरवठा विभागास तक्रारी ही देण्यात आल्या आहेत.

समस्या दूर होणे गरजेचे
सर्व्हर, नेटवर्कची समस्या काही ठिकाणी येत आहे. ती समस्या कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे यंत्रणा कमी आहे. सर्व्हरची समस्या आली तर सर्वच ठिकाणी येते, नेटवर्कची समस्या काही प्रमाणात तालुक्यात आहेत. जर ऑफलाईन धान्य दिले तर दुकानदारांना कमिशनची समस्या येते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनेच धान्य वितरण होते. सर्व्हरची समस्या असेल तर राज्य पुरवठा विभागाकडून ती समस्या दूर होणे गरजेचे आहे, असे रास्त दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.

साईट प्रॉब्लेम, नेटवर्क समस्येमुळे पॉसमशिन बंद पडत आहे. त्यामुळे धान्य देताना दुकानदारांना अडचणी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नाही तर राज्यभरात पॉस मशीनच्या तक्रारी आहेत. साईटसुरू झाल्यानंतर धान्य वाटप होत आहे- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 21/Jan/2026