रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणि जबरदस्त व्यूहरचनेचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली पंचायत समिती गणातील (Pali Panchayat Samiti Gana) शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा संजय कांबळे (Dr. Padmaja Sanjay Kamble) यांची ‘बिनविरोध’ निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ही केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेनेची बिनविरोध निवडून येणारी पहिली जागा ठरली आहे.
विरोधकांना मोठा धक्का
आज पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पाली हा मंत्री उदय सामंत यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे सामंत यांनी आखलेल्या अभेद्य व्यूहरचनेमुळे विरोधकांना उमेदवार उभा करणेही शक्य झाले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे इतर पक्ष आणि विरोधकांसाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्रात खाते उघडले
जिल्ह्यातून शिवसेनेने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी होती आणि तीच जागा बिनविरोध काढून उदय सामंत यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा मुहूर्त साधला आहे. डॉ. पद्मजा कांबळे यांच्या रूपाने शिवसेनेने या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिले खाते उघडल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
सामंतांची यशस्वी रणनीती
पाली पंचायत समिती गण बिनविरोध होण्यामागे उदय सामंत यांची स्थानिक पातळीवरील पकड आणि विकासकामांच्या जोरावर निर्माण केलेला विश्वास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या (Mahayuti) कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे.













