Republic Day Parade 2026: गेल्या 77 वर्षांत जे कधीच घडलं नाही, ते आता होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सिनेमा इतिहास रचणार असून, ही जबाबदारी दिग्गज निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सिनेमाची झलक सादर होणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संजय लीला भन्साळी इंडियन सिनेमा सादर करणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने ही झलक साकारली जाणार असून, त्यामधून भारतीय सिनेमाचा गौरव करण्यात येणार आहे. आतापर्यंत परेडमध्ये सिनेमा क्षेत्राची झलक कधीच सादर झाली नव्हती, त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक ठरणार आहे.
राष्ट्रीय मंचावर भन्साळींना मोठी जबाबदारी
हा सन्मान केवळ भन्साळी यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण इंडियन मनोरंजन सृष्टीसाठी अभिमानास्पद मानला जात आहे. राष्ट्रीय मंचावर इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय सिनेमाचं प्रतिनिधित्व पहिल्यांदाच होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप संजय लीला भन्साळी किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
7 वेळा नॅशनल अवॉर्ड विजेते
संजय लीला भन्साळी हे केवळ दिग्दर्शकच नाहीत, तर ते निर्माता, पटकथालेखक, एडिटर आणि संगीतकारही आहेत. आपल्या दर्जेदार कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत तब्बल 7 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देवदास, ब्लॅक, पद्मावत आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांना नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. भव्य सेट्स, ऐतिहासिक कथा आणि कलात्मक दिग्दर्शन ही भन्साळींच्या सिनेमाची ओळख आहे. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप पाडली होती.
संजय लीला भन्साळींचे आगामी चित्रपट
दिग्दर्शनासोबतच भन्साळी सध्या निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांनी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटाची को-प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी घेतली आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘लव्ह अँड वॉर’ या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शनही ते करत असून, हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.रिपब्लिक डे परेडमध्ये इंडियन सिनेमाची झलक साकारण्याचा हा क्षण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार असून, संजय लीला भन्साळी यांच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 22-01-2026














