संगमेश्वर तालुक्यात शेवटच्या दिवशी तब्बल ६५ उमेदवारी अर्ज दाखल

संगमेश्वर : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या समर्थक, कार्यकर्त्यांची देवरूख तहसील परिसरात तोबा गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यात काही जि. प. गटात हायहोल्टेज लढती होणार आहेत.

शिवसेना- भाजपा – राष्ट्रवादी (अजित पवार) आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे युवानेते व माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी कोसुंब गटातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी माजी आमदार सुभाष बने, बाळकृष्ण बने, जिल्हा संपर्कप्रमुख राजु महाडिक, विलास चाळके, बापू शेट्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच गटातून भाजपच्या प्रमोद अढटराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या गटात भाजप व शिवसेना शिंदे गट अशी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

धामापूर जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कसबा जि. प. गटातून माजी जि. प. अध्यक्षा सौ. रचना महाडिक यांनी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून अर्ज भरला. कसबा पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय उर्फ बापू सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोंडगाव पं. स. गणातून महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे जया माने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. मुचरी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ. माधवी मनोहर गीते तसेच नावडी पंचायत समिती गणातून सुहास सोमा मायगडे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने ताकदवान उमेदवार मैदानात उतरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. माधवी गीते यांनी गेल्या पाच वर्षांत विविध विकासात्मक कामे राबवत मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा आदी क्षेत्रांत केलेल्या कामांमुळे त्यांच्या कार्यकाळाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्याच पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर नावडी पंचायत समिती गणात पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ लगावत सुहास सोमा मायगडे यांना उमेदवारी दिली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे मायगडे यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दोघांचेही अर्ज आज सादर झाल्याने परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून आगामी निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 22/Jan/2026