Rajapur : लग्न कर, नाहीतर ठार मारीन धमकी देऊन नाहक त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

राजापूर : तालुक्यातील एका तरूणीला माझ्याशी लग्न कर, नाहीतर ठार मारीन, अशी धमकी देऊन नाहक त्रास देणाऱ्या लांजा-वाकेड येथील एका व्यक्ती विरोधात राजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने राजापूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीमध्ये पीडित तरुणी व तिची आई ऑक्टोबर महिन्यात बसने पंढरपूर येथे गेले होते. या बसमध्ये ती व्यक्तीदेखील होती.

या बसमधील सर्व प्रवाशांचा एक व्हाटस्अप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपमधील पीडित तरुणीचा मोबाईल नंबर घेवून त्या व्यक्तीने पीडित तरुणीला फोन करून तू माझ्याशी लग्न करशील का, असे विचारले होते. त्यावर पीडितेने लग्नाला नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून संशयित आरोपीने पीडित तरूणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला ठार मारेन अशी धमकी देवून तिचा मोबाईल फोडून टाकल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 22/Jan/2026