Ratnagiri : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या जनजागृती पदयात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे सन २०२५-२६ सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने समाजातील विविध सामाजिक प्रश्नाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन केले आहे.

पदयात्रेमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती, प्रदूषण मुक्ती, निसर्ग संवर्धन, भ्रष्टाचार निर्मूलन, सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, पाणीटंचाई व जलसंवर्धन, राष्ट्रीय सुरक्षा, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण, स्त्री सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या विविध सामाजिक विषयावर फलक, घोषवाक्ये व संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ही पदयात्रा उद्या (२३ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगण येथून सुरू होणार असून ते सिव्हिल हॉस्पिटल- जेल रोड नाका- माळ नाका- मारुती मंदिर पुन्हा याच मार्गाने महाविद्यालयापर्यंत येऊन समारोप होणार आहे.

या पदयात्रेमध्ये संस्थेच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई व इतर संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, संस्थेतील इतर घटक संस्थांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व उपप्राचार्य प्रा सुनील गोसावी यांनी या सामाजिक जनजागृती पदयात्रेमध्ये रत्नागिरी शहरातील नामांकित विविध मंडळे सामाजिक व शैक्षणिक संस्थांना आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 22/Jan/2026