रत्नागिरीत २४ जानेवारीला डॉ. शुभदा गोखले यांचे “संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस (रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाले अंतर्गत येत्या शनिवारी (दि. २४ जानेवारी) सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत अध्यात्म मंदिर, वरची आळी येथे डॉ. सौ. शुभदा मोहन गोखले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

संत तुकाराम महाराजांच्या अभंग साहित्यावर सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. सौ. शुभदा गोखले यांचे “संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता” या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. गोखले या मराठी, इतिहास विषयांच्या अभ्यासक असून त्यांनी बालभारतीच्या (पुणे) पाठ्यपुस्तक निर्मितीत योगदान दिले आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षिका, अधिव्याख्याता तसेच मुख्याध्यापक म्हणून दीर्घकाळ शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले आहे.

डॉ. गोखले यांनी “तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता – एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली असून, अभंग मंत्रगीतेवर आधारित संशोधन, व्याख्याने, अभंग गायन व निरूपणाचे अनेक उपक्रम त्यांनी राज्यभर सादर केले आहेत. यामध्ये “स्वरूपाचा कल्पतरू”, “संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता (सार्थ)” तसेच “तुका झाला स्वरूपवंत” या ग्रंथांचा समावेश आहे. समाज प्रबोधन, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास या दृष्टीने त्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा, स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत असून सध्या यूट्यूब माध्यमातूनही त्यांची अभंग मंत्रगीतेवरील व्याख्यानमाला सुरू आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 22/Jan/2026