Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी समिती

रत्नागिरी : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक वातावरणात होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत माध्यमांचा गैरवापर थांबवणे, मतदारांना दिशाभूल होऊ न देणे आणि जाहिरातींमधील आचारसंहितेचे पालन बंधनकारक ठेवण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या तत्काळ कार्यान्वित केल्या आहेत.

जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी साप्रवी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असतील. उमेदवार तसेच राजकीय पक्षांना कोणतीही निवडणूक-संबंधित जाहिरात इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित करण्यापूर्वी पूर्वप्रमाणे घेणे अनिवार्य आहे. भारतीय संविधान व कायद्यांना विरोध करणारा मजकूर, धर्म, जात, भाषा, लिंग किंवा पेहरावावर आधारित द्वेष निर्माण करणारे संदेश, प्रार्थनास्थळांचे फोटो किंवा व्हिडीओ, हिंसेला प्रोत्साहन देणारे मजकूर, व्यक्ती, संस्था किंवा न्यायालयाची बदनामी करणारी, देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवणारे विधान, परकीय देशांबद्दल अवमानकारक विधाने, संरक्षण दलाचे फोटो किंवा व्हिडीओ, राजकीय नेत्यांवर खोटे आरोप, व्यक्तीच्या खासगी आयुष्यात अनुचित हस्तक्षेप, अनैतिक, अश्लील किंवा नीतीनियमांच्या विरुद्ध सामग्री, अशा स्वरूपाच्या जाहिरातींना अनुमती मिळणार नाही.

जर जाहिरात राजकीय पक्षाने केली असेल, तर ती पक्षाच्या निवडणूक खर्चात नोंदवली जाईल. उमेदवाराने केल्यास, ती उमेदवाराच्या खात्यात दाखविणे बंधनकारक राहील. सोशल मीडियावरील वैयक्तिक मते जाहिरात म्हणून समजली जाणार नाहीत; परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या लेखी परवानगीशिवाय प्रचार केल्यास ती जाहिरात ठरेल आणि त्यासाठी प्रमाणन आवश्यक राहील.

मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करण्याची आवश्यकता नाही. परंतु, अशा माध्यमातून जाहिरातील प्रसिद्ध करताना आचारसंहिता किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. तसेच, इतर प्रत्येक मुद्रित साहित्यावर प्रकाशक, मुद्रणालय, पत्ता, प्रत क्रमांक आणि प्रत संख्या नमूद असणे बंधनकारक आहे. निवडणूक जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे आदी माध्यमांद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्व मर्यादांमध्ये काम झाले, तसेच याहीवेळी अपेक्षित धरले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 22/Jan/2026