महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग, काँग्रेसचा उद्धवसेनेच्या सुरात सूर

राज्यातील २९ महानरपालिकांच्या महापौरपदासाठी काढण्यात आलेली सोडत वादग्रस्त ठरली आहे. मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गातीत महिलेला आरक्षित झाल्यानंतर या सोडतीला उद्धवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर आता काँग्रेसनेही उद्धव सेनेच्या सुरात सूर मिसळला आहे. तसेच महापौरपदाचे आरक्षण ही फिक्सिंग असून, भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनुसार आरक्षण प्रक्रिया पार पडली, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

महापौरपदाच्या आरक्षणाबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज २९ महापालिका निकडवणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.पण ही फिक्सिंग होती,पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेलीं नाही. भाजपचे नगरसेवक निवडून त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.

यावेळी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये भाजपा आणि काँग्रेस एकत्र येत असल्याचा दावा करणाऱ्या मनसेच्या नेत्यांवरही टीका केली. मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये.मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:14 22-01-2026