ब्रेकिंग: रत्नागिरी नगरपालिकेत ‘राडा’! इंजिनिअर उपनगराध्यक्षांच्या अंगावर धावला? ‘शौचालय घोटाळा’ प्रकरणाला हिंसक वळण

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील (Ratnagiri Municipal Council) गाजत असलेल्या ४ कोटींच्या ‘शौचालय घोटाळ्या’वरून आज सायंकाळी पालिकेत मोठा राडा (Rada) झाला. या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी गेलेले नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर (Samir Tivarekar) यांच्या अंगावर पालिकेचा एक इंजिनिअर (Engineer) धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. “संबंधित इंजिनिअरने मला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली,” असा गंभीर आरोप समीर तिवरेकर यांनी केला असून, त्यांनी आता थेट पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेतली आहे.

नेमके काय घडले?
समीर तिवरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांनी उघडकीस आणलेल्या शौचालय दुरुस्ती घोटाळ्याबाबत अधिक माहिती आणि कागदपत्रे पाहण्यासाठी ते आज सायंकाळी नगरपालिकेत गेले होते. त्यांनी एका कर्मचाऱ्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, त्या कर्मचाऱ्याने संबंधित इंजिनिअरकडे विचारणा करण्यास सांगितले.
इतक्यात तो इंजिनिअर तेथे आला आणि काही समजण्याच्या आतच त्याने उपनगराध्यक्षांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, संबंधित इंजिनिअरने थेट समीर तिवरेकर यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

घोटाळा उघड केल्याचा राग?
दोनच दिवसांपूर्वी समीर तिवरेकर यांनी प्रशासक राजवटीत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ४ कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. एकाच शौचालयावर वारंवार दुरुस्तीचा खर्च टाकून पैसे लाटल्याचे त्यांनी पुराव्यासह मांडले होते. यामुळे पालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. याच रागातून आजचा हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.

महायुती आक्रमक, पालकमंत्र्यांकडे तक्रार
लोकप्रतिनिधीलाच पालिकेत धमकी देण्यात आल्याने महायुतीचे (Mahayuti) नगरसेवक संतप्त झाले आहेत. शिवसेना गटनेते बाळू साळवी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत नगराध्यक्ष आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीला जर अधिकारी अशी वागणूक देत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

भाजप नगरसेवकांची पोलीस ठाण्यात धाव
समीर तिवरेकर यांनी पोलिसांत धाव घेतल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात समर्थकांनी आणि भाजप नगरसेवकांनी गर्दी केली. त्यानंतर समीर तिवरेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांची  देखील भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. आता पोलीस या ‘मुजोर’ इंजिनिअरवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.