Ratnagiri : रिसॉर्ट चालकाकडून आर्थिक फसवणूक प्रकरणात दाम्प्त्याविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी: तालुक्यातील नांदिवडे येथील रिसॉर्ट तोंडी करारावर चालविण्यास घेऊन फिर्यादी महिला, तिचा पती आणि मुलाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी पुणे येथील दाम्प्त्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना १ जानेवारी २०२५ ते १९ मे २०२५ या कालावधीत घडली आहे. मुकुंद माधव चाफेकर (वय ७०) आणि आरती मुकुंद चाफेकर (६५, दोन्ही रा. रोहन लेहरबाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्प्त्याचे नाव आहे. त्यांच्या विरोधात मोहना मनमोहन जोग (६८, रा. खालवाडी नांदिवडे, रत्नागिरी) यांनी बुधवार २१ जानेवारी २०२६ रोजी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मोहना जोग यांच्या मालकीचे नांदिवडे येथील रिसॉर्ट संशयित दाम्प्त्याने तोंडी करारावर चालवण्यास घेतले होते.

या व्यवहारातून गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी फिर्यादी यांचा मुलगा व पती यांना खोटेपणाने व अप्रामाणिपणे वेगवेगळी प्रलोभने व आमिषे दाखवून फिर्यादी महिलेला त्यांच्या बंगल्याचा वरील मजला वापरण्याची, रिसॉर्ट चालवणे व नारळाचे उत्पन्न घेण्यास परवानगी देण्यास भाग पाडले. त्यानंतर या दाम्प्त्याने फिर्यादीचा मुलगा आणि पती यांचा विश्वासघात करून संगनमताने त्यांची आर्थिक फसवणूक केली.

दरम्यान, दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वा. कालावधीत फिर्यादी महिला आपल्या घराच्या अंगणामध्ये उभी असताना संशयित मुकुंद चाफेकर ने त्यांना अश्लिल बोलून व हावभाव करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 23/Jan/2026