भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून ‘बंदोबस्त अॅपची निर्मिती आणि वापर; एसपी नितीन बगाटे यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी नेमण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी नावीन्यपूर्ण अशा ‘बंदोबस्त अॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात प्रथमच रत्नागिरी पोलिस दलाकडून अशा अॅपची निर्मिती आणि वापर करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत २७महत्त्वाचे व अतिमहत्त्वाचे बंदोबस्त नेमून प्रभावी व परिणामकारक वापर करण्यात आलेला आहे. बंदोबस्ताचे नियोजन अधिक सुसूत्र, शिस्तबद्ध व परिणामकारक करण्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभावी नियंत्रण ठेवता यासाठी हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात साजरे होणारे विविध सण, महोत्सव, महत्त्वाचे आनंदोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महत्त्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या हालचाली दरम्यान, राबवण्यात येणारी विविध अभियाने तसेच इतर महत्त्वाच्या दिनांनिमित्त पोलिस ठाणे व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त नेमण्यात येतो. ‘बंदोबस्त अॅप’मधील विशेष बाब म्हणजे, सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना डिजिटल पध्दतीने बंदोबस्त पॉईंट व कर्तव्याची नेमणूक याव्दारे करता येते. तसेच अॅपव्दारे आपले देण्यात आलेले कर्तव्य ठिकाण पाहणे व ऑनलाईन हजेरी नोंदवण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे.

तसेच जर पोलिस अधिकारी-अंमलदार हे त्यांना नेमण्यात आलेल्या बंदोबस्त पॉईंट (बंदोबस्तचे ठिकाण) सोडून इतरत्र ठिकाणी गेल्यास त्याबाबतचा अलर्ट मेसेज वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना या अॅपच्या माध्यमातून लागलीच प्राप्त होतो. व त्यामुळे बंदोबस्तावर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे नियंत्रण राहते व बंदोबस्तामध्ये सुसूत्रता तसेच बंदोबस्त अधिक प्रभावी व परिणामकारक होत असल्याचे बगाटे यांनी सांगितले. यामुळे पोलिस अधिकारी-अंमलदार यांचे जिओ लोकेशन वरिष्ठ प्रभारी पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांना लागलीच मॉनिटर करणे सहज शक्य झाले आहे.

बंदोबस्त अॅप’चे वापरकर्ते
स्वतः पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह ४ पोलिस उपविभागीय अधिकारी, १ पोलिस उपअधीक्षक (पोलिस मुख्यालय), रत्नागिरी, १७ पोलिस निरीक्षक, २१ सहायक पोलिस निरीक्षक, ६७ पोलिस उपनिरीक्षक, ११८ सहायक पोलिस फौजदार, ४६४ पोलिस हवालदार आणि ७८८ पोलिस नाई व पोलिस कॉस्टेबल असे एकूण १ हजार ४८१ जण या ‘बंदोबस्त अॅप’ चा वापर करतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 23/Jan/2026