स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत : सतेज पाटील

Satej Patil on Devendra Fadnavis: बदलापूरसारख्या घटनांना सरकार जबाबदार आहे, राज्यात कायदाचा बोजवारा उडाला आहे. या सगळ्या घटनांना सरकार जबाबदार आहे. अशा घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जातं होतं.

त्यामुळेच अशा घटना घडल्या जात आहेत, कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढतं, स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असतात मग गृहखाते आपल्याकडे कशाला ठेवता? अशा शब्दात काँग्रेसचे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हल्ला चढवला. आता राज्यात केवळ 4 अधिकारी गृहखाते सांभाळत असल्याचं दिसतं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बदलापूर घटनेचा आम्ही निषेध करतो, पण असे कृत्य करण्याचे धाडस कसं केलं जातं असेही ते म्हणाले.

लाडकी बहिण फक्त निवडणुकीसाठी आहे का?

सतेज पाटील म्हणाले की, मुलींच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे हे अशा घटनांवरून दिसत आहे. लाडक्या बहिणींचे अनुदान अडवले आहे. केवळ निवडणुकीपूरती ही योजना चालू केली होती का? दरम्यान, मुंब्य्रात सहर शेखने केलेल्या टीकेवरही सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, राजकारणात सत्ता येते आणि जाते. मात्र आव्हाड यांच्यावर झालेली टीका योग्य वाटत नाही. 25 वर्षे त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्यामुळे मोठे झाला आहात, पण उमेदवारी दिली नाही म्हटल्यानंतर लगेच अशी कशी टीका केली जाऊ शकते? आमच्या भगिनीनं केलेली टीका योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले.

पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक नकोत

सतेज पाटील यांनी पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक नकोत अशी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्याचं आम्ही ऐकत आहे. मात्र, याबाबत सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. हा निर्णय घेत असताना सरकारने आधीच स्पष्ट भूमिका केली पाहिजे. नियमावली कशी करणार हे महत्वाचे आहे. निवडणुकीपूर्वी हे व्हायला हवे होते. आता सरकार नियुक्त करणार की संख्याबळावर करणार हे पाहणे महत्वाचं आहे. राजकीय कार्यकर्त्याने पुनर्वसन करण्यासाठी हे करू नये. त्याच्या अटी-शर्ती स्ट्राँग करा. तुम्हाला स्वीकृत करायचे असेल तर निवडणुकच का घेता? अशी टीका त्यांनी केली. दुहीचं राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला ठेवणे ही सगळ्यांची भूमिका असणार आहे. भाजपने अचलपूरमध्ये या ठिकाणी एमआयएमबरोबर युती केली आहे. त्यामुळे भाजपचा चेहरा समोर येत आहे. वापरा आणि फेका ही भाजपची वृत्ती असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:21 23-01-2026