Chiplun : “धुमस” नाटकाने अंधश्रध्देमुळे होणाऱ्या अघोरी कृत्यावर टाकला प्रकाश

चिपळूण : समाजातील माणूस अंधश्रद्धेत गुरफटला की त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे भान राहत नाही. अंधश्रद्धा ही समाजात अघोरी कृत्य करण्यास भाग पाडते. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्या जीवाचा खेळ मांडला जातो. गुप्त खजिना मिळवण्याची लालसा आणि त्यातून घेतलेले नरबळी आणि वन्य प्राण्याची हत्या व खुनाचा शोध असे कथानक असलेले धुमस नाटक म्हणजे माणसाच्या डोळ्यात अंधश्रद्धेच्या विरुद्ध पारदर्शकता आणणारी कलाकृती आहे.

नाटकाचे लेखक अतुल साळवे यांनी व्यक्तिरेखांची अचूक मांडणी केली आहे. यातील नेपथ्य मांडणी आणि राजेश पवार यांनी केलेले दिग्दर्शन यामुळे धुमस नाटकाची कलाकृती रसिकांना भावली. समाजात अनेकदा अंधश्रद्धा, काळी जादू, तंत्र-मंत्र यांच्या आहारी जाऊन अनेकदा काही अघोरी प्रकारही वन्यजीवांच्या बाबतीत मानवाकडून घडतात. अशाच एका अंधश्रद्धेमुळे मानव आणि वाघिण यांच्यात घडलेल्या चित्तथरारक संघर्षाची कथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सादर झालेल्या नाटकातून मांडण्यात आली.

नाटकाचं कथानक ‘रुद्रापाल’ या वन अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यूभोवती फिरते. गावच्या सरपंचाने कथित खजिन्याचा हव्यासापोटी काळी जादू करणाऱ्या मांत्रिकाच्या समवेत घेतलेला एका बछड्याचा बळी आणि या दुष्कृत्याची माहिती मिळाल्यानंतर रुद्रपालकडून त्यांच्यावर होणारी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी रुद्रापालचाही घेतलेला बळी हे नाटकाचं कथानक जसं जसं पुढे जातं तसं तसं हळूहळू स्पष्ट होत जातं. ‘अरुण्येश’ हा रुद्रापालचा बालमित्र या मृत्यूचे गूढ उकलण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात रुद्रापालच्या प्रेयसीची म्हणजेच ‘पालवी’ची सरपंचाच्या प्रचंड दबावाविरोधात जाऊन साथ मिळते. वाघ, वाघिणी, अस्वल इत्यादी वन्यप्राणी यांचे पात्र दाखवण्याचा केलेला प्रयत्न योग्य वातावरणनिर्मिती करतात. सर्व गावकरी आणि पोलीस यांच्यासमोर आधी वाघाच्या बछड्याचा आणि नंतर रुद्रपालचा घेतलेला बळी ही सत्य परिस्थिती जेव्हा पालवी पुराव्यानिशी सर्वासमोर मांडते तेव्हा प्रतिकात्मकपणे रुद्रपालच्या आत्म्याला मोक्ष मुक्ती मिळाल्याचं दाखवून नाटक संपतं.

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याची झलक सदर नाटकात पहायला मिळते. भव्य नेपथ्य, उत्कृष्ट अभिनय, गूढ कथा आणि उकृष्ट सादरीकरण यामुळे ‘धुमस’ हे नाटक प्रेक्षकांना भावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 23/Jan/2026