खेडमध्ये २६ जानेवारीला ‘तारे जमीन पर’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन

खेड : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोंकणी मुस्लिम संघ, खेड यांच्या वतीने दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तारे जमीन पर’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा खेड येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, महाड नाका येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पार पडणार आहे. स्पर्धेत विविध वयोगटांनुसार वेगवेगळे विभाग ठेवण्यात आले असून लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी रंग भरणे, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी विषयाधारित चित्रकला ठेवण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आवडता खेळ’ आणि ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ हे विषय देण्यात आले असून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खेड नगर परिषद कचरा व्यवस्थापन’ आणि ‘माझ्या स्वप्नातला भारत’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांसाठी सायकल हे प्रमुख बक्षीस असणार आहे. प्रत्येक प्रशालेतून किमान १०० स्पर्धक सहभागी झाल्यासच त्या प्रशालेला बक्षिसांसाठी पात्रता मिळणार आहे. तसेच प्रशालेतील कला शिक्षकांनी या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक व परीक्षक म्हणून उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

स्पर्धेकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उद्यानाच्या गेटबाहेर थांबून सहकार्य करावे, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील कला, कल्पकता आणि देशप्रेम अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 23/Jan/2026