खेडमध्ये रानडुकराच्या शिकारीप्रकरणी वनविभागाची कारवाई; एका संशयित आरोपीला अटक

खेड : खेड तालुक्यात रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वनविभागाने प्रभावी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक केली असून इतर दोन आरोपी फरार झाले आहेत. ही कारवाई २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. मौजे वनपाल खेड व वनरक्षक काडवली हे व्याघ्र गणनेचे काम करत असताना निगडे, ता. खेड बोर्जे सीमेलगत असलेल्या माळरान क्षेत्रात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. श्री. राजेश भानुशाली यांच्या मालकीच्या शेतजमिनीत सर्वे नं. ६३/अ मध्ये तीन अनोळखी व्यक्ती रानडुकराची शिकार करून मृत अवस्थेत दोन रानडुकर घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

या कारवाईदरम्यान बाबू भागोजी शिंदे, रा. माणे, ता. खेड याला वनविभागाने पकडले, तर उर्वरित दोन आरोपी जवळच्या जंगल भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपीची झडती घेतली असता काळ्या रंगाच्या पिशवीतून ९६ जिवंत गावठी बॉम्ब तसेच दोन रानडुकरांचे मृत अवशेष आढळून आले.

या प्रकरणी आरोपी बाबू भागोजी शिंदे याला जप्त मुद्देमालासह माननीय न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, खेड यांच्या समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ही संपूर्ण कारवाई श्रीमती गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) आणि श्री. प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली श्री. प्रकाश पाटील, वनपाल खेड श्री. जय भागवत, वनरक्षक काडवली परमेश्वर डोईफोडे यांच्यासह संबंधित वन कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणे, त्याला इजा पोहोचवणे, त्याच्या अवयवांची तस्करी किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींना कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांबाबत कोणतीही अवैध कृती आढळल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर किंवा जवळच्या वन कार्यालयाशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 23/Jan/2026