चिपळूण : रायगडमधील महाड येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून दुचाकीने रत्नागिरी जिल्ह्याकडे पळालेल्या दोन सराईत चोरट्यांना चिपळूण पोलिस आणि आरसीपीच्या पथकाने कामथे येथील जंगलात घेरले. यातील एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले तर दुसरा चोरटा अद्याप घनदाट जंगलात लपून बसला आहे. पोलिसांनी कामथे कदमवाडी, जावळेवाडी येथे कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस या चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.
गुरूवारी सकाळी महाड येथे ही चोरीची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून चोरटे दुचाकीने भरधाव वेगाने रत्नागिरी जिल्ह्याकडे पळाले. याबाबतची तक्रार येताच महाड पोलिसांनी नाकाबंदी केली. संबंधित घटनेची माहिती तातडीने रत्नागिरी पोलिसांना कळवली. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. हे चोरटे चिपळूण वरून सावर्डेच्या दिशेने जाताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.
त्यांचा हा गनिमी कावा पोलिसांनी बरोबर हेरला. त्यामुळे कामथे घाटातील एका ठिकाणी दुचाकी लावून त्यांनी जंगलात धूम ठोकली. हे चोरटे कामथे कदमवाडी आणि जावळेवाडीतील ग्रामस्थांना दिसले आणि एकच खळबळ उडाली. तोपर्यंत त्याठिकाणी पोलिसही पोहोचले. दरम्यान ग्रामस्थांनी यातील एका चोरट्याला बेदम चोप देत दोरीने बांधून ठेवले तर दुसरा चोरट्याने ग्रामस्थ आणि पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावून जंगलात पळ काढला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 23/Jan/2026














