जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्रिकुटा टेकड्यांवर झालेल्या हिमवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव माता वैष्णो देवीची यात्रा स्थगित करण्यात आली.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.
माता वैष्णो देवी मंदिरात या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाल्याने निसर्ग सौंदर्यात भर पडली असली तरी, भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कटरा येथील बेस कॅम्पमधून भाविकांना पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली असून, जे भाविक आधीच मार्गावर आहेत त्यांना सुरक्षित स्थळी थांबण्यास सांगण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत नवीन यात्रेकरूंना मंदिराकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (२७० किलोमीटर लांबी) हिमवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. विशेषतः बनिहाल-काझीगुंड पट्ट्यातील नवयुग बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली आहे. याशिवाय मुघल रोड, श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आणि सिंथन रस्ता देखील बर्फामुळे झाकला गेला आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती पाहता राजौरी, पूंछ आणि कठुआ या डोंगराळ जिल्ह्यांमधील सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांना मदतीसाठी पोलिसांनी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामबन, डोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरी, रियासी, उधमपूर आणि कठुआ या परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. अनेक भागांत ५ इंच ते १ फुटापेक्षा जास्त बर्फ साचला आहे. जम्मू शहरासह मैदानी भागात झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांच्या दुष्काळाचा अंत झाला असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 23-01-2026














