रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रातील चालकांचे मानधन ग्रामपंचायत स्तरावरून अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कमी महसूल असलेल्या ग्रामपंचायतींच्या आर्थिक अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक गणित जुळवताना कसरत करावी लागणार आहे. तसेच गावच्या विकासावरही मर्यादा येणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पंचायतराज संस्थांच्या कारभारामध्ये पंचायत प्रकल्पांतर्गत एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले, त्यांच्या रहिवास क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे, इतर व्यावसायिक सेवा, बैंकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच ठिकाणी मिळाव्यात या हेतूने शासन निर्णयान्वये राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले.
हा प्रकल्प केंद्र शासन प्रेरीत कंपन्यांमार्फत राबवण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार कंपनीबरोबर करार करण्यात आला होता. चौदाव्या वित्त आयोगाची मुदत संपल्यानंतर या करारास मुदतवाढ देण्यात आली होती. हा करार दि. ३० जूनला संपला होता. संबंधित कंपनीची उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. मात्र कंपनीने हा प्रकल्प चालवण्यास नकार दिल्याने आपले सरकार सेवा केंद्र चालक अडचणीत आले होते.
राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रचालक (ग्रामोद्योजक) यांचे मानधन ग्रामपंचायत स्तरावरून अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. काही ग्रामपंचायतींची लोकसंख्या कमी असल्याने तीन ग्रामपंचायतींमध्ये एका केंद्रचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन ग्रामपंचायतींनी मिळून त्या केंद्रचालकास सुमारे १० हजार रुपयांचे मानधन शासनाच्या नवीन नियमानुसार द्यावयाचे आहे.
निर्णयाची अमंलबजावणी करताना होणार कसरत…
शासनाच्या या निर्णयाचा फटका कमी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना बसण्याची शक्यता आहे. ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पत्र दोन लाखांच्या आत आहे. अशा ग्रामपंचायतींची या निर्णयाची अंमलबजावणी करताना कसरत होणार आहे. जिल्ह्यातील ठरावीक ग्रामपंचायतींची कर वसुली १०० टक्के होत असते. प्रत्यक्ष येणारा कर आणि केंद्रचालकाला द्यावयाचे मानधन याचा मेळ बसणे शक्य होईल.
रक्कम भरण्याची ग्रामपंचायतींना सूचना…
आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत प्रकल्पांतर्गत केंद्र चालकांचे जुलै २०२४ ते मार्च २०२५ अखेर १३ हजार ४६४ रुपयांप्रमाणे रकम जिल्हास्तरावर ग्रामपंचायतींनी जमा करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीची कार्यवाही सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 29/Oct/2024














