रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या कोकणनगर ते चर्मालय रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या, खोके व इतर पत्र्यांच्या दुकानांचे अतिक्रमण रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने शुक्रवारी सकाळी हटवण्यास सुरुवात केली. कोकणनगर येथे काही पक्क्या बांधकामांची दुकाने असल्याने तेथील अतिक्रमण स्वतःहून हटवण्याची तयारी संबंधित दुकानदारांनी दर्शवली. त्यामुळे दुपारपर्यंत ५० टक्के अतिक्रमण हटवल्याच्या ठिकाणी महावितरणची भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे कामही सुरू झाले. याठिकाणी ५० ते ५५ अतिक्रमणे आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेचे नगर अभियंता यतिराज जाधव सहकारी आनंद थोरात, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी ही मोहीम फत्ते केली. सकाळी ९ वाजता कारवाईला सुरूवात झाली. २ जेसीबी, २ ट्रॅक्टरच्या मदतीने ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.
सकाळी अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाल्यानंतर काही दुकानदारांनी थोडासा विरोध केला. परंतु हा विरोध तग धरत नसल्याचे पाहून दुकाने आणि दुकानातील सामान स्वतःहून काढण्यासाठी मुदत मागण्यात आली. नुकसान होवू नये यासाठी अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारपर्यंत मुदत दिली. दुपारपर्यंत खोके, टपऱ्या तात्पुरत्या शेड असे ५० टक्के अतिक्रमण काढले गेले. रत्नागिरी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवाई वाहतूक यंत्रणेसाठी वीज वाहिनी टाकणे आवश्यक होते. परंतु रस्त्याच्या कडेने जेथून भूमिगत वीजवाहिनी टाकायची आहे त्या ठिकाणी अतिक्रमण असल्याने वीज वाहिनी टाकण्यासाठी नियुक्त झालेल्या ठेकेदाराकडून कामाला सुरूवात होत नव्हती. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने रत्नागिरी नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सहकार्य मागितले.
रत्नागिरी शहरातील रस्ते, फुटपाथ आदी ठिकाणचे अतिक्रमण स्वतः हन हटवण्याबाबत जाहीर नोटीस नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. १७ जानेवारीपर्यंतची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कोकणनगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. याठिकाणची ही कारवाई संपल्यानंतर शहरात इतर ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.
रस्त्याच्या जागेत खासगी संरक्षक भिंत…
चर्मालय ते कोकणनगरच्या पुढे जाणारा रस्ता ३० मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात हा रस्ता १० मीटरचाच आहे. अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणही रखडले आहे. अतिक्रमण हटाव कारवाई करताना तेथील अनेकांनी सरकारी रस्त्याची काही जागा स्वतःच्या हद्दीत घेऊन तेथे संरक्षक भिंती घातल्या असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 24/Jan/2026














