Kamal Khan : ओशिवारा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक

ओशिवारा गोळीबार प्रकरणात ओशिवारा पोलिसांनी अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके (KRK) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून, तिथे पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कमाल खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं आहे की, गोळीबार त्याच्याच शस्त्रातून झाला आहे. मात्र हे शस्त्र परवानाधारक असल्याचं खानचं म्हणणं आहे. पोलीस सध्या या दाव्याची पडताळणी करत असून संशयास्पद शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. या शस्त्राशी संबंधित कागदपत्रांचीही कसून तपासणी सुरू आहे.

शुक्रवारी रात्री कमाल खानला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रं आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. सध्या कमाल खान पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तपासदरम्यान पोलिसांना नालंदा सोसायटीमध्ये दोन गोळ्या सापडल्या आहेत. यातील एक गोळी दुसऱ्या मजल्यावर, तर दुसरी गोळी चौथ्या मजल्यावर आढळून आली. यातील एक फ्लॅट एका लेखक-दिग्दर्शकाचा आहे, तर दुसरा फ्लॅट एका मॉडेलचा असल्याचं समजतं.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ओशिवारा पोलीस ठाण्याचे १८ सदस्यांचं पथक आणि गुन्हे शाखेची अनेक पथकं तैनात होती. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमधून कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की, गोळ्या बहुदा कमाल खानच्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या गेल्या असाव्यात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 24-01-2026