देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथे जमिनीच्या वादातून तोडून ठेवलेली खैराची २० झाडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरादपूर वरची वाडी येथील फिर्यादी बळीराम सीताराम चौगुले (६०) आणि संशयित पर्शराम गोविंद चौगुले यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. हिस्सा नं. ८२/९ मधील जागेत २० खैराची झाडे तोडून ठेवलेली होती.
या जागेबाबत वाद असल्याने सरकारी मोजणी झाल्यानंतर आणि मालकी हक्क सिद्ध झाल्यानंतरच ही झाडे कोणी न्यायची, हे ठरले होते. मात्र, जमिनीची अधिकृत मोजणी होण्यापूर्वीच संशयिताने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय ही झाडे चोरून नेली. ही घटना २० जानेवारी रोजी दुपारी ४ ते २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. चोरून नेलेल्या या २० खैराच्या झाडांची एकूण किंमत ३ लाख ६० हजार रुपये इतकी असून, प्रत्येक झाडाची किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे. याप्रकरणी बळीराम चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरुख पोलिसांनी आरोपी पर्शराम चौगुले याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा कलम ३०३ (२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 24/Jan/2026














