रत्नागिरी – ईश्वर दूर किंवा अमूर्त नाही. जिथे प्रेम आहे, तिथे तो प्रकट होतो, जेव्हा प्रेम अधिक गहिरे होते, तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाला रूपांतरित करते. भक्ती ही प्रेमात पूर्णपणे विलीन होण्याची अवस्था आहे.
भक्ती आणि सत्संग यांमुळे व्यक्तीमत्त्वातील कठोरता मऊ होते. त्यामुळेच आपले जीवन अधिक रसमय आणि सुंदर बनते, असे मार्गदर्शन गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केले.
२२ जानेवारी या दिवशी ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या वतीने जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ऐतिहासिक ‘भक्ती उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम येथील गोगटे महाविद्यालयाच्या क्रीडांगणात पार पडला. या वेळी सहस्रो भक्तांनी गुरुदेवांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार विनय कोरे यांचीही उपस्थिती लाभली.
१. राग, द्वेष आणि नकारात्मक भावना यांमुळे मनावर परिणाम होतो. ज्यांना आपण क्षमा करू शकत नाही किंवा ज्यांच्याबद्दल आपण मनात राग बाळगतो, ते आपल्या मनावर स्वार होऊ लागतात. कालांतराने आपण नकळत त्यांच्यासारखेच वागू लागतो. भक्तीच्या रसात स्वतःला बुडवून घेतल्याने मन भीती आणि चिंतेपासून मुक्त होते, धैर्य निर्माण होते. जेव्हा आपल्या अहंकाराची भावना वितळते, तेव्हा आत जे उरते तीच खरी भक्ती असते.
२. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्येही हा उत्सव साजरा होऊ लागला. जेव्हा आरती होते, तेव्हा प्रत्येक जण इतर सर्व काही विसरून जातो. जेव्हा विठोबाची पालखी निघते आणि लोक पंढरपूरपर्यंत पायी चालत जातात, तेव्हाही आपल्याला भक्तीचा तोच आविष्कार दिसतो, जो आपल्या हृदयाला स्पर्शून जातो.
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये जी भक्ती आणि शौर्य जागृत केले, ते आजही जिवंत आहे आणि भविष्यातही जागृत राहील. १६ व्या शतकात महाराष्ट्राने भक्तीची एक शक्तीशाली लाट अनुभवली. आज ती लाट पुन्हा एकदा परत आणण्याचे दायित्व आपले आहे.
४. जगातील बाकी देश निकामी आहेत, असे नाही; पण वसुधैव कुटुंबकम् असे मानणारा भारत भक्ती, कर्म आणि ज्ञानामुळे जगात वेगळा आहे. ते टिकविण्याचे दायित्व आपले आहे.
५. आयुर्वेद अंगीकारला पाहिजे. प्रकृतीला तो उपयुक्त आहे. अधिकाधिक मुलांना आयुर्वेदीय डॉक्टर बनवावे. त्यांच्यामार्फत भारताचा योग आणि आयुर्वेद जगभरात जाईल.
६. देशात मानसिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरोघरी ध्यानधारणेची आवश्यकता आहे. ध्यानाने, सुदर्शनक्रियेने व्यक्तीला विशालता येते. मानवी जीवन क्षणिक आहे. त्यामध्ये भांडणतंटे नकोत. दुःख, सुख, मनासारख्या आणि मनाविरुद्ध घटना घडतच असतात. आहे ती परिस्थिती स्वीकारणे, कोणत्याही स्थितीत मानसिक संतुलन राखणे, हीच जीवन जगण्याची कला आहे.
७. जीवनात चमत्कारांची कमतरता नाही; पण मानवी जीवन हेच चमत्कार आहे. प्रत्येक परिस्थितीत अदृश्य शक्तींचे साहाय्य होते, जीवनात आनंद मिळतो, प्रेम मिळते, हाच चमत्कार आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील १० लाख डॉक्टर्स ध्यानात सहभागी झाले. त्याचा पुष्कळ लाभ झाला.
८. नार्वेमध्ये झालेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, सुदर्शनक्रियेमुळे शरिरातील जीन्स कॅन्सर, अल्झायमरसारख्या ३०० हून अधिक रोगांचे जीन्स निष्क्रीय होतात. ध्यानाचे हे महत्त्व लक्षात घेऊन जगभरातील १९३ देशांनी एकत्र येऊन विश्व ध्यान दिवस साजरा करायला प्रारंभ केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 24-01-2026














