चिपळूण : तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशीतील पोफळी, कोंडफणसवणे, कुंभार्ली, शिरगाव व मुंढे या गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावत असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भरत लब्ध्ये यांच्या पुढाकाराने पोफळी येथील महानिर्मितीच्या विद्युत संकुलात बैठक घेण्यात आली. यावेळी ६० एचपीचा पंप बसवून पाणी लिफ्ट करून ते टंचाईग्रस्त गावांना दिले जाईल, असे महानिर्मितीच्या पोफळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी सांगितले.
या बैठकीस कुंभार्लीचे सरपंच रवींद्र सकपाळ, केशव लांबे, बागवे कोंडफणसवणेचे उपसरपंच संकेत पवार, सुरेश शिगवण, प्रकाश जाधव, सुनील जाधव, तुकाराम जाधव, संतोष कदम, सुधीर कदम, शेखर पवार यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच महानिर्मितीचे मुख्य अभियंता श्री. चोपडे, सिव्हिल विभागाचे कार्यकारी अभियंता बेंद्रे, कोयना सिंचन विभागाच्या सहायक अभियंता माने, अभियंता दरेकर, राजीव राणे यांच्यासह विविध विभागांचे होते. अधिकारी उपस्थित होते.
सर्जवेलमधील गळती दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्यामुळे या परिसरातील गावांना ग्रॅव्हिटीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व उपाययोजना ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्य अभियंता श्री. चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, अत्यंत कठीण व खर्चिक दुरुस्तीचे काम सुरू असतानाही पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महानिर्मितीने ६० एचपी क्षमतेचा पंप बसवून पाणी लिफ्ट करण्याची व्यवस्था केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, संबंधित गावांनीही पाणीवाटपाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठ्याअभावी गृहिणींची मोठी तारांबळ उडत असून, जनावरांसाठी व दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी अधिक सतर्क राहून काम करावे, असे सूचित करताना भरत लब्ध्ये यांनी जनतेच्या अडचणी गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
कोंडफणसवणे पाणीपुरवठा ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी
कोंडफणसवणे गावातील नागरिकांनी पाणी कमी मिळत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या पूर्ण क्षमतेने भराव्यात, अशी मागणी केली. बैठकीनंतर उपस्थित मान्यवरांनी पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 24/Jan/2026














