रत्नागिरी : जिल्हा माहिती कार्यालयाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

रत्नागिरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. ही पूर्वपीझिका राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असे उद्गार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा‍धिकारी एम देवेंदर सिंह यांनी काढले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ही पूर्वपीठिका तयार करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, एमसीएमसी सदस्य पत्रकार मुश्ताक खान, आकाशवाणीचे योगीराज बच्चे, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेंद्र बापट, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यावेळी उपस्थित होते.

या निवडणूक पूर्वपीठिकेत १९६२ ते २०१९ या कालावधीतील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. आताच्या निवडणुकीचा कार्यक्रम, विधानसभा मतदारनिहाय अंतिम मतदारांची आकडेवारी, विधानसभा मतदारनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त समिती यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष क्रमांक, निवडणूक आचारसंहितेनुसार काय करावे, काय करु नये, प्रचारसंबंधी सूचना, पेड न्यूज, प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, समाजमाध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आदींची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी ही पूर्वपीझिका संपादित केली आहे. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळ्ये आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 29-10-2024